A lot of information is shared like Satyanarayan Katha PDF in Hindi and Marathi language with Pooja items. If you want to download a PDF file and read about the Satyanarayanachi Katha (सत्यनारायणाची कथा) then follow this article ahead. Here we will not only share the Satyanarayanachi Katha PDF but also share the Puja Samagri List including the श्री सत्यनारायण कथा पूर्ण अध्याय in Marathi. So keep on reading this post ahead.
Satyanarayanachi Katha PDF
Let us tell you that “Satyanarayana Katha” is a religious pooja and retinal followed by the Hindu people to dedicate God Vishnu. God Vishnu is known by different names in Hindu scriptures and Satyanarayana is one of them. This Katha is specially worshiped for Lord Vishnu. The way of pooja and Katha formate is mentioned in the Skanda Purana. If you are searching for a Satyanarayanachi Katha in PDF format then you can download it from the link mentioned below.
Download => Satyanarayanachi Katha PDF in Marathi
About Satyanarayan Pooja
There are lots of benefits of Satyanarayana Puja like worldly and spiritual benefits. It showcases Naryana’s vows to protect his devotees during Kali Yoga. Performing a pooja is a promise to God. Many devotees complete Satyanarayan Pooja. You need some items before performing Satyanarayana Puja. We have given the list of Satyanarayana Puja below.
Satyanarayan Katha/ Puja Samagri List
- A bell
- A ghee lamp (with at least three wicks)
- A large yellow cloth (to cover the Altar), yellow is the favorite color of Satnarayan.
- A picture of Lord Satyanarayana
- A piece of yellow or red cloth (for the Kalash)
- A small idol (or coin) of Lord Satyanarayana (optional)
- An oil lamp
- Betel nuts (50)
- Betelnut leaves (100)
- Camphor
- Coconut (8)
- Coins (40)
- Cotton wicks
- Dry Dates/Almonds (50)
- Durva Or Dhoop grass (sacred grass according to Sanatana Dharma)
- Flowers, Tulasi leaves
- Garland and floral garlands
- Haldi (turmeric powder)
- Incense sticks (agarbattis)
- Kumkum (red, vermillion or sindoor)
- Low Altar table (for use as Altar)
- Naivedhya (food which we offer to God)
- Navadhanya (nine types of grains each representing one of the Navagraha, nine planets)
- Panch amrita (uncooked mixture of milk, yogurt, honey, sugar, and ghee)
- Sandalwood paste
- Two flat plates
- Two jars (Silver, Copper, Brass, or even earthen) – one for Kalash and another for the ritual
- Wheat or Jawar (not rice)
Satyanarayan Pooja Hindi PDF Download
We have a Hindi version of the Satyanarayan Katha PDF that you can download on your device. All you have to click the given link and the PDF will download on your device automatically.
Download => Shri Satyanarayan Vrat Katha and Aarti in Hindi
सत्यनारायणाची कथा Marathi
श्रीसत्यनारायण कथा अध्याय पहिला
अथ कथा: । श्रीगणेशाय नम: ॥ एकदा नैमिषारण्ये ऋषय: शौनकादय: ॥ पप्रच्छुर्मुनय: सर्वे सूतं पौराणिकं खलु ॥१॥
ऋषय ऊचु: ॥ व्रतेन तपसा किं वा प्राप्यते वांछितं फलम्। तत्सर्वं श्रोतुमिच्छाम: कथयस्व महामुने ॥२॥
सूत उवाच ॥ नरादेनैव संपृष्टो भगवान्कमलापति: ॥ सुरर्षये यथैवाह तच्छृणुध्वं समाहिता: ॥३॥
एकदा नारदो योगी परानुग्रहकांक्षया ॥ पर्यटन्विविधान्लोकान्मर्त्यलोकमुपागत: ॥४॥
ततो दृषट्वा जनान्सर्वान्नानाक्लेशसमन्वितान्नानायोनिसमुत्पन्नान्क्लिश्यमानान्स्वकर्मभि: ॥५॥
केनोपायेन चैतेषां दु:खनाशो भवेद ध्रुवम्॥ इति संचिंत्य मनसा विष्णुलोकं गतस्तदा ॥६॥
तत्र नारायणं देवं शुक्लवर्णं चतुर्भुजम्॥शंखचक्रगदापद्मवनमालाविभूषितम्॥७॥
श्रीगजाननाय नम: आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिषारण्यात राहणार्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणार्या सूतांना प्रश्न विचारला ॥१॥ ऋषी विचारतात, “हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऎकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा.” ॥२॥ सूत सांगतात, “मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान्महाविष्णूंना विचारला त्या वेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हांला सांगतो. शांत चित्ताने ऎका. ॥३॥ एकदा महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असता मनुष्यलोकांत (भारतात) आले. ॥४॥ आणि मनुष्यलोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दु:खे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून ॥५॥ कोणत्या साधनाने त्यांची दु:के नक्की नाहीशी होतील, हा विचार करून नारदमुनी वैकुंठात गेले. ॥६॥ त्या वैकुंठात चार हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला.” ॥७॥
दृष्ट्वा तं देवदेवेशं स्तोतुं समुपचक्रमे ॥ नारद उवाच ॥ नमो वाङमनसातीतरूपायानंतशक्तये ॥८॥
आदिमध्यांतहीनाय निर्गुणाय गुणात्मने ॥ सर्वेषामादिभूताय भक्तानामार्तिनाशिने ॥९॥
श्रुत्वा स्तोत्रं ततो विष्णुर्नारदं प्रत्यभाषत । श्रीभगवाननुवाच ॥
किमर्थमागतोऽसि त्वं किं ते मनसि वर्तते ॥ कथयस्व महाभाग तत्सर्व कथयामि ते ॥१०॥
नारद उवाच ॥ मर्त्यलोके जना: सर्वे नानाक्लेशसमन्विता: । ननायोनिसमुत्पन्ना: पच्यंते पापकर्मभि: ॥११॥
तत्कथं शमयेन्नाथ लघुपायेन तद्वद ॥ श्रोतुमिच्छामि तत्सर्वं कृपाऽस्ति यदि ते मयि ॥१२॥
श्री भगवानुवाच ॥ साधु पुष्टं त्वया वत्स लोकानुग्रहकांक्षया ॥ यत्कृत्वा मुच्यते मोहात्तच्छृणुष्व वदामि ते ॥१३॥
व्रतमास्ति महत्पुण्यं स्वर्गे मर्त्ये च दुलभम्॥ तव स्नेहान्मया वत्स प्रकाश: क्रियतेधुना ॥१४॥
नारद म्हणाले, “ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे; तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दु:खे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो.” ॥८॥ ॥९॥ नारदमुनींनी केलेली स्तुती ऎकून भगवान्विष्णु नारदाजवळ बोलले. भगवानम्हणाले, “मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा. मीत्याचे समर्पक उत्तर देईन.” ॥१०॥ नारद म्हणाले, “हे भगवंता, मृत्युलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दु:खे भॊगीत आहेत.” ॥११॥ नारद म्हणाले, “हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दु:खी लोकांची सर्व दु:खे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझी ऎकण्यची इच्छा आहे.”॥१२॥ भगवान्म्हणतात, “हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूजे जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दु:खे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. ॥१३॥ हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. ॥१४॥
सत्यनारायणस्यैवं व्रतं सम्यग्विधानत: ॥ कृत्वा सद्य: सुखं भुक्त्वा परत्र मोक्षमाप्नुयात्॥१५॥
तच्छुत्वा भगवद्वाक्यं नारदो मुनिरब्रवीत्॥ नारद उवाच ॥ किं फलं किं विधानं च कृतं केनैव तद्व्रतम्॥१६॥
तत्सर्वं विस्तराद्ब्रुहि कदा कार्यं हि तद्व्रतम् ॥ श्रीभगवानुवाच ॥ दु:खशोकादिशमनं धनधान्यप्रवर्धनम्॥१७॥
सौभाग्यसंततिकरं सर्वत्र विजयप्रदम् ॥ यस्मिन्कस्मिन्दिने मर्त्यो भक्तिश्रद्धासमन्वित: ॥१८॥
सत्यनारायणं देवं यजैश्चैव निशामुखे ॥ ब्राह्मणैर्बान्धवैश्चैव सहितो धर्मतत्पर: ॥१९॥
नैवेद्यं भक्तितो दद्यात्सपादम भक्ष्यमुत्तमम्॥ रंभाफलं घृतं क्षीरं गोधुमस्य च चूर्णकम्॥२०॥
अभावे शालिचूर्णं वा शर्करां च गुडं तथा ॥ सपादं सर्वभक्ष्याणि चैकीकृत्य निवेदयेत्॥२१॥
या व्रताला सत्यनारायणव्रत असे म्हणतात. हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो. ॥१५॥ भगवान् विष्णूंचे भाषण ऎकून नारदमुनी विष्णूंना म्हणाले, “हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते, ॥१६॥ ते सर्व विस्तार करून मला सांगा. त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा.” हे नारदाचे भाषण ऎकून भगवान म्हणाले, “नारदा, हे व्रत दु:ख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. ॥१७॥ तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे, हे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी (सूर्यास्तानंतर दोन तासांत) सत्यनारायणाचे पूजन करावे. ॥१८॥ ॥१९॥ केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद (सव्वा पावशेरे, सव्वा अच्छेर, सव्वा शेर इत्यादी प्रमाणे करून) भक्तियुक्त अंत:करणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. ॥२०॥ गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू सव्वा या प्रमाणाने एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. ॥२१॥
विप्राय दक्षिणां दद्यात्कथां श्रुत्वा जनै: सह ॥ ततश्च बुंधुभि: सार्धं विप्रांश्च प्रतिभोजयेत् ॥२२॥
सपादं भक्षयेद्बक्त्या नृत्यगीतादिकं चरेत्॥ ततश्च स्वगृहं गच्छेत्सत्यनारायणं स्मरन्॥२३॥
एवं कृते मनुष्याणां वांछासिद्धिर्भवेद्ध्रुवम्॥ विशेषत: कलियुगे लघूपायोऽस्ति भूतले ॥२४॥
इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायणकथायां प्रथमोऽध्याय: ॥१॥
आपले बांधव व मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऎकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बांधव सत्यनारायणासमोर गायन व नृत्य करावे. हे पूजानादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरि देवघरात पवित्र ठिकाणि करावे. ॥२३॥ पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दु:खनाशाचा हाच एक सोप उपाय आहे.” ॥२४॥ सत्यनारायणकथेतीय प्रथम अध्याय या ठिकाणी पुरा झाला. ॥१॥ हरये नम: ।
॥प्रथमोध्याय: समाप्त: ॥
श्रीसत्यनारायण कथा अध्याय दूसरा
श्रीभगवाननुवाच ॥ अथान्यत्संप्रवक्ष्यामि कृतं येन पुरा द्विज ॥ कश्चित्काशीपुरे रम्ये ह्यासीद्विप्रोऽतिनिर्धन: ॥१॥
क्षुत्तृड्भ्यां व्याकुलो भूत्वा नित्यं बभ्राम भूतले ॥ दु:खितं ब्राह्मनं दृष्ट्वा भगवान्ब्राह्मणप्रिय: ॥२॥
वृद्धब्राह्मणरूपस्तं पप्रच्छ द्विजमादरात्। किमर्थं भ्रमसे विप्र महीं नित्यं सुदु:खित: ॥३॥
तत्सर्वं श्रोतुमिच्छामि कथ्यतां द्विजसत्तम ॥ ब्राह्मण उवाच ॥ ब्राह्मणोऽतिदरिद्रोऽहं भिक्षार्थं वै भ्रमे महीम् ॥४॥
उपायं यदि जानसि कृपया कथय प्रभो । वृद्धब्राह्मण उवाच ॥ सत्यनारायणो विष्णुवांछितार्थफलप्रद: ॥५॥
भगवान म्हणाले, “नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो. ऎक, सुंदर अशा काशीनगरात एक दरिद्री ब्राह्मण राहात होता. (अध्याय २ श्लोक १) भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणारा भगवान त्या दु:खी ब्राह्मणाला पाहून ॥२॥ भगवंतानी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशीनगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, “हे ब्राह्मणा, तू दु:खी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ॥३॥ ते सर्व ऎकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मणश्रेष्ठा, ते तू मला सांग.” हे वृद्ध ब्राह्मणरूपी भगवंताचे भाषण ऎकून तो ब्राह्मण म्हणाला. “मी अती दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. ॥४॥ हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा.” असे ब्राह्मणांचे भाषण ऎकून भगवान म्हणाले. “सत्यनारायण नावाचा विष्णु सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. ॥५॥
तस्य त्वं पूजनं विप्र कुरुष्व व्रतमुत्तमम्॥ यत्कृत्वा सर्वदु:खेभ्यो मुक्तो भवति मानव: ॥६॥
विधानं च व्रतस्यापि विप्रायाभाष्य यत्नत: ॥ सत्यनारायणो वृद्धस्तत्रैवांतरधीयत ॥७॥
तद्व्रतं संकारिष्यामि यदुक्तं ब्राह्मणेन वै । इति संचिंत्य विप्रोऽसौ रात्रौ निद्रां न लब्धवान्॥८॥
तत: प्रात: समुत्थाय सत्यनारायणव्रतम्॥ करिष्य इति संकल्प्य भिक्षार्थमगमद्द्विज: ॥९॥
तस्मिन्नेव दिने विप्र: प्रचुरं द्र्व्यमाप्तवान्॥ तेनैव बंधुभि: सार्धं सत्यस्य व्रतमाचरत्॥१०॥
सर्वंदु:खविनिर्मुक्त: सर्वसंपत्समन्वित: ॥ बभूव स द्विजश्रेष्ठो व्रतस्यास्य प्रभावत: ॥११॥
तत: प्रभृति कालं च मासिमासि व्रतं कृतम्॥ एवं नारायणस्येदं व्रतं कृत्वा द्विजोत्तम: ॥ सर्वपापाविनिर्मुक्ती दुर्लभं मोक्षमाप्तवान्॥१२॥
व्रतमस्य यदाविप्र: पृथिव्यां संकरिष्यति ॥ तदैव सर्वदु:खं च मनुजस्य विनश्यति ॥१३॥
एवं नारायणेनोक्तं नारदाय महात्मने ॥ मया तत्कथितं विप्रा: किमन्यत्कथयामि व: ॥१४॥
“जे व्रत केले असता मनुष्य सर्व दु:खांतून मुक्त होतो त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तू कर.” ॥६॥ त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले. ॥७॥ वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही ॥८॥ नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून ‘मी आज सत्यनारायणाचे व्रत करीन’ असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. ॥९॥ त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले. ॥१०॥ नंतर तो दरिद्री ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दु:खांतून मुक्त झाला व धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला. ॥११॥ त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापांतून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ॥१२॥ ब्राह्मणहो, ज्या वेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावने करील त्या वेळी त्याचे सर्व दु:ख नाहीसे होईल. ॥१३॥ मुनिहो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले अन्य काय सांगू?” ॥१४॥
ऋषय ऊचु: ॥ तस्माद्विप्राच्छुतं केन पृथिव्यां चरितं मुने ॥ तत्सर्वं श्रोतुमिच्छाम: श्रद्धाऽस्माकं प्रजायते ॥१५॥
सूत उवाच ॥ शृणध्वं मुनय: सर्वे व्रतं येन कृतं भुवि । एकदा स द्बिजवरो यथाविभव विस्तरै: ॥१६॥
बंधुभि: स्वजनै: सार्धं व्रतं कर्तुं समुद्यत: ॥ एतस्मिन्नंतरे काले काष्ठक्रेता समागमत्॥१७॥
बहि:काष्ठं च संस्थाप्य विप्रस्य गृहमामयौ ॥ तृष्णया पीडितात्मा च दृष्ट्वा विप्रं कृतव्रतम्॥१८॥
प्रणिपत्य द्विजं प्राह किमिद क्रियते त्वया ॥ कृते किं फलमाप्नोति विस्तराद्वद मे प्रभो ॥ १९ ॥
विप्र उवाच ॥ सत्यनारायणस्येदं व्रतं सर्वेप्सितप्रदम्॥ तस्य प्रसादान्मे सर्वं धनधान्यादिकं महत्॥२०॥
तस्मादेतद्व्रतं ज्ञात्वा काष्ठक्रेताऽतिहर्षित: ॥ पपौ जलं प्रसादं च भुक्त्वा स नगरं ययो ॥२१॥
सत्यनारायणं देव मनसा इत्यचिंतयत्॥ काष्ठं विक्रयतो ग्रामे प्राप्यते चाद्य यद्धनम्॥२२॥
तेनैव सत्यदेवस्य करिष्ये व्रतमुत्तमम्॥ इति संचिंत्यं मनसा काष्ठं धृत्वा तु मस्तके ॥२३॥
ऋषी पुन्हा विचारतात, “त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऎकिले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले, ते सर्व ऎकण्याची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे.” ॥१५॥ सूत म्हणतात, “मुनिहो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो, ते ऎका. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्र यांसह आनंदाने व भक्तीने हे व्रत करीत असताना लाकडे विकणारा मोळीविक्या त्या ठिकाणी आला. ॥१६॥ ॥१७॥ तो मोळीविक्या तहानेने च्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत आहे असे पाहून ॥१८॥ त्याला नमस्कार केला व विचारले, “महाराज, आपण काय करीत आहात? व हे व्रत केल्याने काय फळ मिळते, ते विस्तारपूर्वक सांगा.” ॥१९॥ ब्राह्मण म्हणाला, “सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणाचे व्रत आहे. त्याच्याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे.” ॥२०॥ नंतर त्या मोळीविक्याने हे व्रत समजावून घेतले व अती आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. ॥२१॥ सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळॊ मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्र्व्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनाशी त्याने निश्चय केला व ॥२२॥ २३ ॥
जगाम नगरे रम्ये धनिनां यत्र संस्थिति: ॥ तद्दिने काष्ठमूल्यं च द्बिगुणं प्राप्तवानसौ ॥२४॥
तत: प्रसन्नह्रदय: सुपक्वं कदलीफलम्।। शर्करां घृतदुग्धे च गोधूमस्य च चूर्णकम्॥२५॥
कृत्वैकत्र सपादं च गृहीत्वा स्वगृहं ययौ ॥ ततो बंधून् समाहूय चकार विधिना व्रतम्॥२६॥
तदव्रतस्य प्रभावेण धनपुत्रान्वितोऽभवत्॥ इहलोके सुखं भुक्त्वा चांते सत्यपुरं ययौ ॥२७॥
इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडे श्रीसत्यनारायणव्रतकथायां द्वितीयोऽध्याय: ॥२८॥
धनिक लोक ज्या नगरात राहात होते तिथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. ॥२४॥ नंतर त्याने आनंदी अंत:करणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलावून विधिनोक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. ॥२५॥ ॥२६ ॥ या सत्यनारायणव्रताच्या प्रभावाने तो मोळीविक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. ॥२७ ॥ या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पुरा झाला. ॥२॥ हरये नम:
॥अथ द्वितीयोऽध्याय: समाप्त ॥
श्रीसत्यनारायण कथा अध्याय तिसरा
सूत उवाच ॥ पुनरग्रे प्रवक्षयामि शृणुध्वं मुनिसत्तमा: ॥ पुरा चोल्कामुखो नाम नृपश्चासीन्महीपति: ॥१॥
जितेंद्रिय: सत्यवादी ययौ देवालयं प्रति ॥ दिने दिने धनं दत्त्वा द्विजान्संतोषयन्सुधी: ॥२॥
भार्या तस्य प्रमुग्धा च सरोजवदना सती ॥ भद्रशीला नदीतीरे सत्यस्य व्रतमाचरत्॥३॥
एतस्मिन्नंतरे काले साधुरेक: समागत: ॥ वाणिज्यार्थं बहुधनैरनेकै: परिपूरित: ॥४॥
नावं संस्थाप्य तत्तीरे जगाम नृपतिं प्रति ॥ दृष्ट्वा स व्रतिनं भूपं पप्रच्छं विनयान्वित: ॥५॥
साधुरुवाच ॥ किमिंद कुरुषे राजन्भक्तियुक्तेन चेतसा ॥ प्रकाशं कुरु तत्सर्वं श्रोतुमिच्छामि सांप्रतम्॥६॥
सूत सांगतात, “ऋषीहो, याविषयी आणखी एक कथा सांगतो ती ऎका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. ॥१॥ तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान्होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्र्व्य देऊन संतुष्ट करीत असे. ॥२॥ त्याची भार्या पतिव्रता, सुंदरवदना व अत्यंत रूपवान होती. एक दिवशी तो राजा स्त्रीसह नदीचे तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता. ॥३॥ त्या वेळी साधुवाणी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला, ॥४॥ व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणार्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. ॥५॥ साधुवाणी म्हणाला, “हे राजा, भक्तियुक्त अंत:करणाने हे तू काय करीत आहेस, ते सविस्तर मला सांग. माझी ऎकण्याची इच्छा आहे.” ॥६॥
राजोवाच ॥ पूजनं क्रियते साधो विष्णोरतुलतेजस: ॥ व्रतं च स्वजनै: सार्धं पुत्राद्यावाप्तिकाम्यया ॥७॥
भूपस्य वचनं श्रुत्वा साधु: प्रोवाच सादरम्॥ सर्वं कथय मे राजन् करिष्येऽहं तवोदितम्॥८॥
ममापि संततिर्नास्ति एतस्माज्जायते ध्रुवम्॥ ततो निवृत्य वाणिज्यात्सानंदो गृहमागत: ॥९॥
भार्यायै कथितं सर्वं व्रतं संततिदायकम्॥ तदा व्रतं करिष्यामि यदा मे संसतिर्भवेत्॥१०॥
इति लीलावती प्राह पत्नीं साधु: ससत्तम: ॥ एकस्मिन्दिवसे तस्य भार्या लीलावती सती ॥११॥
भर्तृयुक्तानंदचित्ताऽभवद्धर्मपरयणा ॥ गर्भिणी साऽभवत्तस्य भार्या सत्यप्रसादत: ॥१२॥
दशमे मासि वै तस्य: कन्यरत्नमजायत ॥ दिने दिने सा ववृधे शुक्लपक्षे यथा शशी ॥१३॥
नाम्ना कलावती चेंति तन्नामकरणं कृतम्॥ ततो लीलावती प्राह स्वामिनं मधुर वच: ॥१४॥
राजा म्हणाला, “हे साधो, पुत्र, धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी, सर्व मनोरथ पूर्ण करणार्या सत्यनारायण विष्णूचे पूजनात्मक व्रत मी बांधवासह करीत आहे.” ॥७॥ राजाचे हे वाक्य ऎकून अत्यंत आदराने साधुवाणी म्हणाला. “महाराज आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा; जसे सांगाल तसे मी करीन,. ॥८॥ मला पण संतती नाही. ती या व्रतामुळे नक्की होईल.” असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधुवाणी घरी परत आला, ॥१०॥ व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला सांगितले, ज्या वेळी मला संतती होईल त्या वेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवस पण त्याने केला. ॥१०॥ अशा प्रकारचे व्रत शीलवान्साधु वाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंत:करणाने पतीची सेवा करीत असता, सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. ॥११॥ ॥१२॥ नंतर तिला दहावा महिना सुरू होताच एक कन्यारत्न झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रणाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधु वाण्याला गोड वाणीने प्रश्न विचारला. ॥१३॥ ॥१४॥
न करोषि किमर्थवै पुरा संकल्पितं व्रतम्॥ साधुरुवाच ॥ विवाहसमये त्वस्या: करिष्यामि व्रतं प्रिये ॥१५॥
इति भार्यां समाश्वास्य जगाम नगरं प्रति ।। तत: कलावती कन्या विवृधे पितृवेश्मनि ॥१६॥
दृष्ट्वा कन्यां तत: साधुर्नगरे सखिभि: सह ॥ मंत्रयित्वा द्रुतं दूतं प्रेषयामास धर्मवित्॥१७॥
विवाहार्थं च कन्याया वरं श्रेष्ठं विचारय ॥ तेनाज्ञप्तश्च दुतोऽसौ कांचनं नगरं ययौ ॥१८॥
तस्मादेकं वणिक्पुत्रं समादायागतो हि स: ॥ दृष्ट्वा तु सुंदरं बालं वणिक्पुत्रं गुणान्वितम्॥१९॥
ज्ञातिभिर्बंधुभि: सार्धं परितुष्टेन चेतसा ॥ दत्तवान्साधु: पुत्राय कन्यां विधिविधानत: ॥२०॥
ततोऽभाग्यवशात्तेन विस्मृतं व्रतमुत्तमम्, विवाहसमये तस्यास्तेन रुष्टोऽभवत्प्रभु: ॥२१॥
तत: कालेन नियतो निजकर्मविशारद: ॥ वाणिज्यार्थं गत: शीघ्रं जामातृसहितो वणिक्॥२२॥
“महाराज, पूर्वी केलेले नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का करीत नाही?” असा तिचा प्रश्न ऎकून साधुवाणी म्हणाल. “हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत मी करीन.” ॥१५॥ अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधुवाणी दुसर्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली. ॥१६॥ साधु वाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळींबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठीकांचन नावाच्या नगराला आला. ॥१७॥ ॥१८॥ नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला; त्या वेळी सर्वगुणसंपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून ॥१९॥ त्या साधुवाण्याने आपल्या ज्ञातिबांधवांसह आनंदी अंत:करणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. ॥२०॥ त्या विवाहाचे वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवान्रागावले. ॥२१॥ नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधुवाणी कालाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला. ॥२२॥
रत्नसारपुरे रम्ये गत्वा सिंधुसमीपत: ॥ वाणीज्यमकरोत्साधुर्जामात्रा श्रीमता सह ॥२३॥
तौ गतौ नगरे रम्ये चंद्रकेतोर्नृपस्य च ॥ एतस्मिन्नैव काले तु सत्यनारायण: प्रभु: ॥२४॥
भ्रष्टप्रतिज्ञामालोक्य शापं तस्मै प्रदत्तवान् ॥ दारुणं कठिनं चास्य महद्दु:खं भविष्यति ॥२५॥
एकस्मिन्दिवसे राज्ञो धनमादाय तस्कर: ॥ तत्रैव चागतश्चौरो वणिजौ यत्र संस्थितौ ॥२६॥
तत्पश्चाद्धवकान्दूतान्दृष्ट्वा भीतेन चेतसा ॥ धनं संस्थाप्य तत्रैव स तु शीघ्रमलक्षित: ॥२७॥
ततो दूता: समायाता यत्रास्त्रे सज्जनो वणिक् ॥ दृष्ट्वा नृपधनं तत्र बद्ध्वा दूतैर्वणिक्सुतौ ॥२८॥
हर्षेण धावमानाश्च ऊनुर्नृपसमीपत: ॥ तस्करौ द्वौ समानीतौ विलोक्याज्ञापय प्रभो ॥२९॥
राज्ञाज्ञप्तास्तत: शीघ्रं दृढं बद्ध्वा तु तावुभौ ॥ स्थापितौ द्वौ महादुर्गे कारागारेऽविचारत: ॥३०॥
आणि सिंधु नदीच्या जवळ असणार्या रम्य अशा रत्नपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान्जावयासह तो साधु वाणी व्यापार करू लागला. ॥२३॥ ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काल उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायणप्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायणपूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून याला भयंकर दु:ख प्राप्त होवो असा शाप दिला.॥२४॥ शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसांत चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. ॥२६॥ आपल्यामागून राजदूत येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधुवाण्याच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला. ॥२७॥ इतक्यात ते राजदूत, सज्जन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहेत असे समजून त्या दोघांस बांधले, ॥२८॥ व आनंदाने धावत धावत त्या दोघांना आपणासमोर आणले आहेत. आज्ञा करावी.” ॥२९॥ राजाने विशेष विचार न करताच त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. ॥३०॥
मायया सत्यदेवस्य न श्रुतं कैस्तयोर्वच: ॥ अतस्तयोर्वनं राज्ञा गृहीतं चंद्रकेतुना ॥३१॥
तच्छापाच्च गृहे तस्य भार्या चैवातिदु:खिता ॥ चौरेणापह्रतं सर्वं गृहे यच्च स्थितं धनम्॥३२॥
आधिव्याधिसमायुक्ता क्षुत्पिपासादिदु:खिता ॥ अन्नचिंतापर भूत्वा बभ्राम च गृहे गृहे ॥३३॥
कलावती तु कन्यापि बभ्राम प्रतिवासरम्॥ एकस्मिन्दिवसे जाता क्षुधार्ता द्विजमंदिरम्॥ गत्वाऽपश्यद्व्रतं तत्र सत्यनारायणस्य च ॥३४॥
उपविश्य कथां श्रुत्वा वरं प्रार्थितवत्यपि ॥ प्रसादभक्षणं कृत्वा ययौ रात्रौ गृहं प्रति ॥३५॥
माता कलावती कन्यां पृच्छयामास प्रेमत: ॥ पुत्रिं रात्रौ स्थिता कुत्रं किं ते मनसि वर्तते ॥३६॥
कन्या कलावती प्राह मातरं प्रति सत्वरम्॥ द्विजालये व्रतं मातर्दृष्टां वांछितसिद्धिदम्॥३७॥
त्यावेळी आम्ही चोर नाहीं असे ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऎकले नाहि; उलट साधुवाण्याचेच सर्व द्रव्य जप्त केले.॥३१॥ सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाण्याच्या भार्येला फार दु:ख झाले व त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. ॥३२॥ तेव्हापासून मानसिक दु:ख व रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दु:खी झालेली साधुवाण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. ॥३३॥ साधुवाण्याची मुलगी कलावतीपण घरोघर भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले, ॥३४॥ आणि तेथे बसली व नंतर कथा ऎकून सत्यनारायणप्रभूची प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. ॥३५॥ त्या वेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले की, “हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कोठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे?” ते ऎकून कलावती म्हणाली, “हे आई, मी ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले.” ॥३६॥ ॥३७॥
तच्छुत्वा कन्यकावाक्य व्रतं कर्तुं समुद्यता ॥ सा मुद्रा तु वणिग्भार्या सत्यनारायणस्य च ॥३८॥
व्रतं चक्रे सैव साध्वी बंधुभि” स्वजनै: सह ॥ भर्तृजमातरौ क्षिप्रमागच्छेतां स्वमाश्रमम् ॥ ३९॥
अपराधं च मे भर्तार्जामातु: क्षन्तुमर्हसि ॥ इति दिव्यं वरं वव्रे सत्यदेवं पुन: पुन: ॥ व्रतेनानेन तुष्टोऽसौ सत्यनारायण: प्रभु: ॥४०॥
दर्शयामास स्वप्नं हि चंद्रकेतुं नृपोत्तमम्॥ बंदिनौ मोचय प्रातर्वणिजौ नृपसत्तम ॥४१॥
देय धनं च तत्सर्वं गृहीतं यत्त्वयाऽधुना ॥ नो चेत्त्वां नाशयिष्यामि सराज्यधनपुत्रकम्॥४२॥
एवमाभाष्य रामानं ध्यानगम्योऽभवत्प्रभु: ॥ तत: प्रभात समये राजा च स्वजनौ: सह ॥४३॥
उपविश्य सभामध्ये प्राह स्वप्नं जनं प्रति ॥ बद्धौ महाजनौ शीघ्रं मोचयध्वं वणिक्सुतौ ॥४४॥
इति राज्ञो यच: श्रुत्वा मोचयित्वा महाजनौ ॥ समानीय नृपस्याग्रे प्राहुस्ते विनयान्विता: ॥४५॥
मूलीचे वाक्य ऎकून आनंदी झालेली साधुवाण्याची भार्या सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली ॥३८ ॥ व त्या पतिव्रता असणार्या साधुवाण्याच्या भार्येने आपला पती व जावई लवकर घरी येवोत असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यांसह सत्यनारायणाचे पूजन केले ॥३२॥ व ‘हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात’ अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्या वेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. ॥४०॥ नंतर चंद्रकेतुच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, “हे नृपश्रेष्ठा, तू जे दोन वाणी बंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. ॥४१॥ तसेच हे राजा, तू जे त्यांचे धन घेतले आहेस ते त्यांचे त्यांना परत दे. ॥४२॥ असे जर तू न करशील तर धन, पुत्र व राज्य यांसह तुझा नाश करीन.” असे राजास स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान्अदृश्य झाले. नंतर प्रात:काळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना ते स्वप्न सांगितले व जे दोन वाणी आपण बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दुतांना आज्ञा केली. ॥४३॥ ॥४४॥ दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्याचा जावई या दोघांना बंधमुक्त करून राजाच्यासमोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले. ॥४५॥
आनीतौ द्वौ वणिक्पुत्रौ मुक्तौ निगडबंधनात्॥ ततो महाजनौ नत्वा चंद्रकेतुं नृपोत्तमम्॥४६॥
स्मरंतौ पूर्ववृत्तान्तं मोचतुर्भयविव्हलौ ॥ राजा वणिक्सुतौ वीक्ष्य वच: प्रोवाच सादरम्॥४७॥
दैवत्प्राप्तं महद्दु:खनिदानीं नास्ति वै भयम्॥ सदा निगडसंत्यागं क्षौरकर्माद्यकारयत्॥४८॥
वस्त्रालंकरण दत्वा परितोष्य नृपश्च तौ । पुरस्कृत्य वणिक्पुत्रौ वचसाऽतोषयद्भृशम्॥४९॥
पुरा ह्रतं तु यद्द्रव्यं द्विगुणीकृत्य दत्तवान् ॥ प्रोवाच तौ ततो राजा गच्छ साधो निजाश्रमम् ॥५०॥
राजानं प्रणिपत्याह गंतव्यं त्वप्रसादत: ॥५१॥
इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायणव्रतकथायां तृतीयोऽध्याय: ॥३॥
“महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून दोनही वैश्यपुत्र आणले आहेत.” नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतु राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तान्त आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. ॥४६॥ त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतु राजा आदराने म्हणाला, “वैश्यहो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दु:ख भोगावे लागले. आता भीती नाही.” असे बोलून त्यांच्या बेड्या काढवून क्षौरकर्म व मंगलस्नान करविले. ॥४७॥ ॥४८॥ नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले ॥४९॥ व त्या वाण्याने जे द्रव्य घेतले ते ते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाला, ‘हे साधो, आपण आपल्या घरी जा.” नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, “आम्ही आपल्या कृपेने घरी जातो.” ॥५०॥ ॥५१॥ या ठिकाणी सत्यनारायण कथेतील तिसरा अध्याय पुरा झाला. ॥३॥ हरये नम: ॥
॥इति तृतीयोध्याय: समाप्त: ॥
श्रीसत्यनारायण कथा अध्याय चौथा
सूत उवाच ॥ यात्रां तु कृतवान्साधुर्मंगलायनपूर्विकाम्॥ ब्राह्मणाय धनं दत्त्वा तदा तु नगरं ययौ ॥१॥
कियद्दुरे गते साधौ सत्यनारायण: प्रभु: ॥ जिज्ञासां कृतवान्साधो किमस्ति तव नौस्थितम्॥२॥
ततो महाजनौ मत्तौ हेलया च प्रहस्य वै ॥ कथं पृच्छसि भॊ दंडिन्मुद्रां नेतु किमिच्छसि ॥३॥
लतापत्रादिकं चैव वर्तते तरणौ मम ॥ निष्ठुरं च वच: श्रुत्वा सत्यं भवतु ते वच: ॥४॥
एवमुक्त्वा गत: शीघ्रं दंडी तस्य समीपत: ॥ कियद्दॄरे ततो गत्वा स्थित: सिंधुसमीपत: ॥५॥
गते दंडिनि साधुश्च कृतनित्यक्रियस्तदा ॥ उत्थितां तरणीं दृष्ट्वा विस्मयं परमं ययौ ॥६॥
नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राह्मणांस दक्षिणा देऊन आशिर्वाद घेतला व जावयासह स्वत;चे नगरास गेला. ॥१॥ तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यासवेष धारण करणार्या सत्यनारायणप्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी “हे साधो, या तुझ्या नौकेत काय आहे, ते सांग” असा प्रश्न विचारला. ॥२॥ धनाने उन्मत्त झालेले ते दोन वाणी त्याची निंदा करून हसू लागले व म्हणाले, “संन्यासीबुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? ॥३॥ आमची नौका वेली व पाने यांनी भरलेली आहे.” असे साधुवाण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऎकून भगवान्म्हणाले, “तुझे बोलणे खरे होवो.” ॥४॥ असे बोलून संन्यासवेष धारण करणारे भगवान्तेथून गेले व तिथूनथोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले ॥५॥ संन्यासी दूर गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. ॥६॥
दृष्ट्वा लतादिकं चैव मूर्च्छितां न्यपतद्भुवि ॥ लब्धसंज्ञो वणिक्पुत्रस्ततश्चिंतान्वितोऽभवत्॥७॥
तदा तु दुहित:कांतो वचनं चेदमब्रवीत्॥ किमर्थं क्रियते शोक:शापो दत्तश्च दंडिना ॥८॥
शक्यते तेन सर्वं हि कर्तुं चात्र न संशय: ॥ अतस्तच्छरणं यामो वांछितार्थो भविष्यति ॥९॥
जामातुर्वचनं श्रुवा तत्सकाशं गतस्तदा ॥ दृष्ट्वा च दंडिनं भक्त्या नत्वा प्रोवाच सादरम्॥१०॥
क्षमस्व चापराधं मे यदुक्तं तव सन्निधौ । एवं पुन: पुनर्तत्वा महाशोकाकुलोऽभवेत्॥११॥
प्रोवाच वचनं दंडी विलपंतं विलोक्य च ॥ मा रोदी: शृणु मद्वाक्यं मम पूजाबहिर्मुख: ॥१२॥
ममाज्ञया च दुर्बुद्धे लब्धं दु:खं मुहुर्मुहु: ॥ तच्छुत्वा भगवद्वाक्यं स्तुतिं कर्तुं समुद्यत: ॥१३॥
साधुरुवाच ॥ त्वन्मायामोहिता: सर्वे ब्रह्माद्यास्त्रिदिवौकस: ॥ न जानंति गुणान्रूपं तवाश्चर्यमिदं प्रभॊ ॥१४॥
नौकेत वेली व पाने पाहून तो साधुवाणी मूर्च्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्यावेळाने सावध होऊन चिंता करू लागला. ॥७॥ त्या वेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, “महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे ॥८॥ तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील.” ॥९॥ असे जावयाचे भाषण ऎकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला. ॥१०॥ “महाराज, मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा.” असे म्हणून पुन: पुन्हा नमस्कार केला व तो साधुवाणी अतिशय दु:खी झाला. संन्यासवेषधारी भगवान्शोक करणार्या साधुवाण्याला म्हणाले, “शोक करू नकोस. ॥११॥ मी सांगतो ते ऎक. तू माझ्या पूजनाविषयी पराङमुख आहेस ॥१२॥ व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दु:ख प्राप्त झाले.” हे ऎकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. ॥१३॥ साधुवाणी म्हणाला, “तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप हे जाणू शकत नाहीत. हे प्रभॊ, हे आश्चर्य आहे.” ॥१४॥
मूढोऽहं त्वां कथं जाने मोहितस्तव मायया ॥ प्रसीद पूजयिष्यामि यथाविभवविस्तरै: ॥१५॥
पुरावित्तं च तत्सर्वं त्राहि मां शरणागतम्॥ श्रुत्वा भक्तियुतं वाक्यं परितुष्टो जनार्दन: ॥१६॥
वरं च वांच्छितं दत्वा तत्रैवांतर्दधे हरि: ॥ ततो नावं समारुह्य दृष्ट्वा वित्तप्रपूरिताम्॥१७॥
कृपया सत्यदेवस्य सफलं वांछितं मम । इत्युक्त्वा स्वजनै: सार्धं पूजां कृत्वा यथाविधि ॥१८॥
हर्षेण चाभवत्पूर्णं सत्यदेवप्रसादत: । नावं संयोज्य यत्नेन स्वदेशगमन कृतम्॥१९॥
साधुर्जामातरं प्राह पश्य रत्नपुरीं मम ॥ दूतं च प्रेषयामास निजवित्तस्य रक्षकम्॥२०॥
दूतोऽसौ नगरं गत्वा साधुभार्या विलोक्य च ॥ प्रोवाच वांच्छितं वाक्य नत्वा बद्धंजलिस्तदा ॥२१॥
निकटे नगरस्यैव जामात्रा सहितो वणिक्॥ आगतो बंधुवर्गेश्च वित्तैश्च बहुभूर्युत: ॥२२॥
श्रुत्वा दूतमुखाद्वाक्यं महाहर्षवती सती ॥ सत्यंपूजां कुरुष्वेति प्रोवाच तनुजां प्रति ॥
व्रजामि शीघ्रमागच्छ साधुसंदर्शनाय च ॥२३॥
तुमच्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. ॥५॥ मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे.” असे साधुवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऎकून भगवान संतुष्ट झाले; ॥१६॥ व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे दिसले; ॥१७॥ व सत्यनारायणाच्या कृपेनेच हे सर्व मला मिळाले असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले, ॥१८॥ व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी आनंदझाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. ॥१९॥ नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, “ही पाहा माझी रत्नपुरीनगरी,” असे बोलून द्र्व्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठविला. ॥२०॥ तो दूत नगरात गेला व साधुवाण्याच्या भार्येला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. ॥२१॥ तो म्हणाला, “बांधव व पुष्कळ द्रव्य यांसह साधुवाणी जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आले आहेत.” ॥२२॥ असे दूताचे वाक्य ऎकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या भार्येने मुलीला ‘सत्यनारायणाची पूजा कर’ असे सांगितले व आपण लगेच पतिदर्शनासाठी गेली. ॥२३॥
तेन रुष्ट: सत्यदेवो भर्तारं तरणीं तथा । संह्रत्य च धनै: सार्धं जले तस्यावमज्जयत्॥२५॥
तत: कलावती कन्या न विलोक्य निजं पतिम्॥ शोकेन महता तत्र रुदती चापतद्भुवि ॥२६॥
दृष्ट्वा तथाविधां नावं कन्यां च बहुदु:खिताम्॥२७॥ भीतेन मन्सा साधु: किमाश्चर्यमिदं भवेत्॥
चिंत्यमानाश्च ते सर्वे बभूवुस्तरिवाहका: ॥२८॥
ततो लीलावतीं कन्यां दृष्ट्वा सा विह्वालाऽभवत्। विलला पातिदु:खेन भर्तारं चेदमब्रवीत्॥२९॥
इदानीं नौकया सार्धं कथं सोऽभूदलक्षित: ॥ न जाने कस्य देवस्य हेलया चैव सा ह्रता ॥३०॥
सत्यदेवस्य माहात्म्य ज्ञातुं वा केन शक्यते ॥ इत्युक्त्वा विललापैव ततस्श्च स्वजनै: सह ॥३१॥
ततो लीलावती कन्यां क्रोडे कृत्वा रुरोद ह ॥३२॥
तत: कलावती कन्या नष्टे स्वामिनि दु:खिता ॥ गृहीत्वा पादुके तस्यानुगंतुं च मनो दधे ॥३३॥
आईचे वाक्य ऎकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले. परंतु प्रसाद भक्षण न करता पतिदर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली, ॥२४॥ त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायणप्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्र्व्यासह पाण्यात बुडविली. ॥२५॥ त्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही, त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हल होऊन ती रडत भूमीवर पडली.॥२६॥ बुडालेली नौका व त्यामुळे दु:खी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंत:करणाने साधुवाणी नावाड्यांसह हा काय चमत्कार, असे म्हणून विचार करू लागला. ॥२७॥ ॥२८॥ नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दु:खी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, ॥२९॥ “अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले? मला हे समजत नाही. ॥३०॥ नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याने दु:खी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. ॥३२॥ ॥३३॥
कन्यायाश्चतिरं दृष्टवा सभार्य: सज्जनो वणिक्॥ अतिशोकेन संतप्त श्चिंतयामासधर्मवित् ॥ ह्रतं वा सत्यदेवेन भ्रांतोऽहं सत्यमायया ॥३४॥
सत्यपूजां करिष्यामि यथाविभवविस्तरै: ॥ इति सर्वान्समाहूय कथयित्वा मनोरथम्॥ ३५ ॥
नत्वा च दंडवद्भूमौ सत्यदेव पुन:पुन: ॥ ततस्तुष्ट: सत्यदेवो दीनानां परिपालक: ॥३६॥
जगाद वचन व्योम्नि कृपया भक्तवत्सल: । त्यक्त्वा प्रसादं ते कन्या पतिं द्रष्टुं समागता ॥ अतोऽदृष्टोऽभवत्तस्या: कन्यकाया: पतिध्रुवम्॥३७॥
गृहं गत्वा प्रसादं च भुक्त्वा साऽऽयाति चेत्पुन: ॥ लब्धभर्त्री सुता साधो भविष्यति न संशय: ॥३८॥
कन्यका तादृशं वाक्यं श्रुत्वा गगनमंडलात्॥ क्षिप्रं तदा गृहं गत्वा प्रसादं च बुभोज सा ॥३९॥
सा पश्चात्पुनरागत्य ददर्श स्वजनं पतिम्॥४०॥
तत: कलावती कन्या जगाद पितरं प्रति ॥ इदानीं च गृहं याहि विलंबं कुरुषे कथम्॥४१॥
धार्मिक व सज्जन असा तो साधुवाणी भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणानेच नौका नाहिशी केली असेल कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. ॥३४॥ नंतर सर्वांना बोलावून साधुवाण्याने, ‘माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन’ असे सर्वांना सांगितले. ॥३५॥ आणि सत्यनारायणाला पुन: पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दीनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, “हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे म्हणुन तिचा पती अदृश्य झाला. ॥३६॥ ॥३७॥ हे साधो, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात शंका नाही.” ॥३८॥ आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. ॥४०॥ नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, “आता लवकर घरी चला, उशीर का करता?” ॥४१॥
तच्छुत्वा कन्यकावाक्यं संतुष्टोऽऽभूद्वणिक्सुत: ॥ पूजनं सत्यदेवस्य कृत्वा विधिविधानत: ॥४२॥
धनैर्बंधुगणै: सार्धं जगाम निजमंदिरम्॥ पौर्णमास्यां च संक्रांतौ कृतवान्सत्यपूजनम्॥४३॥
इहलोके सुखं भुक्त्वा चांते सत्यपुरं ययौ ॥४४॥
इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायणव्रतकथायां चतुर्थोऽध्याय: ॥
मुलीचे हे वाक्य ऎकून तो साधुवाणी अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले, ॥४२॥ व नंतर तो साधुवाणी धन व बांधव यांसह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायणप्रभूचे सत्य लोकात गेला. ॥४३॥ ॥४४॥ या ठीकाणी सत्यनारायणकथेतील चौथा अध्याय पुरा झाला. ॥४॥ हरये नम: ।
॥ इति चतुर्थोsध्याय: समाप्त: ॥
श्रीसत्यनारायण कथा अध्याय पांचवा
सूत उवाच ॥ अथान्यच्च प्रवक्ष्यामि शृणुध्वं मुनिसत्तमा: ॥ आसीदंगध्वजो राजा प्रजापालतत्पर: ॥१॥
प्रसाद सत्यदेवस्य त्यक्त्वा दु;खमवाप स: ॥ एकदा स वनं गत्वा हत्वा बहुविधान्पशून॥२॥
आगत्य वटमूलं च दृष्ट्वा सत्यस्य पूजनम्॥ गोपा: कुर्वन्ति संतुष्टा भक्तियुक्त: सबांधवा: ॥३॥
राज दृष्ट्वा तु दर्पेण न गत्वा तं ननाम स: ॥ ततो गोपगणा: सर्वे प्रसाद नृपसन्निधौ ॥४॥
संस्थाप्य पुनरागत्य भुक्त्वा सर्वे यथेप्सितम्॥ तत: प्रसादं संत्यज्य राजा दु:खमवाप स: ॥५॥
सूत सांगतात, “मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतितत्पर होता. ॥१॥ त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिदु:ख प्राप्त झाले, ते असे- तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंत:करणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत, असे राजाला दिसले. ॥२॥ ॥३॥ परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला; ॥४॥ व नंतर भक्तिभावाने सर्व गोपबांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदु:खी झाला. ॥५॥
तस्य पुत्रशतं नष्टं धनधान्यादिकं च यत्॥ सत्यदेवेन तत्सर्वं नाशितं मम निश्चितम्॥ ६ ॥
अतस्तत्रैव गच्छामि यत्र देवस्य पूजनम्॥ मनसा तु विनिश्चित्य ययौ गोपालसंनिधो ॥७॥
ततोऽसौ सत्यदेवस्य पूजां गोपगणै: सह ॥ भक्तिश्रद्धान्वितो भूत्वा चकार विधिना: नृप: ॥८॥
सत्यदेवप्रसादेन धनपुत्रान्वितोऽभवत्। इहलोके सुखं भुक्त्त्वा चांते सत्यपुरं ययौ ॥९॥
य इदं कुरुते सत्यव्रतं परमदुर्लभम्॥ शृणोति च कथां पुण्यां भक्तियुक्त: फलप्रदाम्॥१०॥
धनधान्यादिकं तस्य भवेत्सत्यप्रसादत: ॥ दरिद्रो लभते वित्तं बद्धो मुच्येत बंधनात्॥११॥
भीतो भयात्प्रमुच्यते सत्यमेव व संशय: ॥ ईप्सितं च फलं भुक्त्वा चांते सत्यपुरं व्रजेत्॥१२॥
इति व: कथितं विप्रा: सत्यनारायण व्रतम्॥ यत्कृत्वा सर्वदु:खेभ्यो मुक्तो भवति मानव:॥१३॥
त्या राजाचे शंभर मुलगे व धनधान्यादि सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेनेच झाले असेल असे राजाला वाटले, ॥६॥ व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. ॥॥ नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्तिश्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. ॥८॥ त्यामुळे हा अंगध्वज राजा धन-पुत्र इत्यादी ऎश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठलोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. ॥९॥ जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो ॥१०॥ त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. ॥१०॥ जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऎश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरास जातो. ॥१२॥ ऋषीहो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दु:खांतून मुक्त होतो, ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. ॥१३॥
विशेषत: कलियुगे-सत्यपुजा फलप्रदा ॥ केचित्कालं वदिष्यंति सत्यमीशं तमेव च ॥ सत्यनारायणं केचित्सत्यदेवं तथापरे ॥१४॥
नानारूपधरो भुत्वा सर्वेषामीप्सितप्रद: ॥ भविष्यति कलौ सत्यव्रतरूपी सनातन: ॥१५॥
य इदं पठते नित्यं शृणोति मुनिसत्तमा: ॥ सत्यं नश्यंति पापानि सत्यदेवप्रसादत: ॥१६॥
इति श्रीस्कंदंपुराणे रेवाखंडे सत्यनारायणव्रतकथायां पंचमोऽध्यायां ॥
विशेषत्वेकरून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. ॥१३॥ ॥१४॥ नानारूपे धारण करुन सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान्कलियुगात सत्यनारायणव्रतरूपी होईल. ॥१५॥ मुनिश्रेष्ठहो, जो कोणी ही सत्यनारायणाची कथा पठण करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्रीसत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. ॥१६॥ या ठिकाणी श्रीसत्यनारायण कथेतील पाचवा अध्याय संपूर्ण झाला.
॥हरये नम: हरये नम: हरये नम: ॥
॥इति पंचमोऽध्याय: समाप्त: ॥